Electric Tarctor: कृषी क्षेत्रात आता नव्या युगाची सुरुवात होणार आहे. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आणि ट्रॅक्टरच्या देखभालीच्या खर्चामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. CSIRच्या संशोधकांनी तयार केलेला नवा इलेक्ट्रीक ट्रॅक्टर केवळ किफायतशीर नाही, तर पूर्णपणे पर्यावरणपूरकही आहे. येत्या काही दिवसांत हा ट्रॅक्टर शेतीत क्रांती घडवणार असून, त्याचे हलके आणि सुलभ डिझाईन पाहता महिलाही तो सहजपणे चालवू शकतील.
केवळ 200 रुपयांत करा 5 तास काम
CSIR चे मुख्य संशोधक डॉ. प्रदीप राजन यांनी सांगितले की हा नवा ई-ट्रॅक्टर शेतीसाठी एकदम क्रांतिकारी ठरणार आहे. पुरुष असो वा महिला – दोघेही तो सहजपणे चालवू शकतात. डिझेल ट्रॅक्टरप्रमाणे यात कंपन किंवा आवाज नाही, त्यामुळे चालवताना थकवा जाणवत नाही. देखभाल खर्चही अत्यल्प आहे. या ट्रॅक्टरला पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे चार तास लागतात, आणि त्यानंतर तो सलग 4 ते 5 तास शेतातील काम करू शकतो. विशेष म्हणजे, जिथे डिझेल ट्रॅक्टर एका तासाला सुमारे 1.5 लिटर डिझेल वापरतो, तिथे या ई-ट्रॅक्टरला पाच तासांसाठी फक्त 18 ते 20 युनिट वीज लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची तब्बल 64 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
26 एचपीची जबरदस्त ताकद, आणि पाच वर्षांहून अधिक टिकणारी बॅटरी!
हा ई-ट्रॅक्टर शक्ती आणि टिकावाचं परफेक्ट कॉम्बिनेशन मानलं जात आहे. 26 हॉर्सपॉवर क्षमतेसह तो दोन बैलांच्या ताकदीपेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली आहे. नांगर, रोटाव्हेटर किंवा इतर शेतीसाठी लागणारी उपकरणं असे सर्व काही हा ट्रॅक्टर सहज हाताळतो. त्यातली सर्वात खास बाब म्हणजे त्याची बॅटरी… पाच वर्षांची गॅरंटी असलेली ही बॅटरी तब्बल दहा हजार वेळा चार्ज आणि डिस्चार्ज करता येते. शेतीबरोबरच वाहतुकीसाठीही हा ई-ट्रॅक्टर उपयोगी ठरतो आणि सलग सहा तासांपर्यंत माल वाहून नेऊ शकतो.
‘ई-ट्रॅक्टर’, शेतकऱ्यांना मिळणार अर्ध्या किमतीत!
या ई-ट्रॅक्टरच्या निर्मिती वर्ष 2020 पासून सुरू झाली आणि अखेर डिसेंबर 2023 मध्ये हे मॉडेल बनून तयार झाले. तब्बल तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण संशोधनानंतर हा ट्रॅक्टर तयार करण्यात आला आहे. सध्या त्याची उत्पादन किंमत सुमारे 8.5 लाख रुपये इतकी आहे. मात्र, शेतकऱ्यांना याचा फायदा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे सबसिडीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही सबसिडी मंजूर झाल्यास, शेतकऱ्यांना हा आधुनिक ई-ट्रॅक्टर केवळ 4 ते 4.5 लाख रुपयांमध्ये मिळू शकतो, अशी माहिती CSIRचे प्रमुख संशोधक अविनाश कुमार यादव यांनी दिली.